Library

दीपस्तंभ – ग्रामार्थन

” ग्रंथालय मुलांसाठी खुली असायला हवी ! “

मुळातच शिक्षण क्षेत्राची आवड आणि याच क्षेत्रात कोणी काम करत आहेत हे पाहून, त्यांना हवी ती मदत करण्याची वृत्ती, यामुळे दीपस्तंभच्या या कामाच आकर्षण वाटलं.

रांजणे गावात ग्रामसुधार प्रकल्प सुरु झाल्यावर अमेय त्याबद्धल बोला होता. सर्वच बाबतीत सुधारणा अपेक्षित होती. शाळा ग्रंथालय याबाबत मदत करण्याची मी तयारी दाखवली होती. टप्याटप्याने गावकरी व ग्रामसभेची तयारी दिसल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. त्यात शाळेत जाऊन शिक्षक – विद्यार्थ्यांशी बोलून त्यांची किती तयारी आहे हे पाहणे निश्चितच आवश्यक होते. म्हणून पहिली भेट रांजणे (ता.वेल्हे , जि.पुणे) गावच्या शाळेला दिली. मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी बोलले. त्यांचे ग्रंथालय पाहिले.

मुख्याध्यापकांच्या खोलीतील एका कपटाचा एक कप्पा बाईनीं उघडून दाखवला, त्याला ग्रंथालय म्हटले . शाळेच्या दोन वर्गात दोन असेच कप्पे दाखवले त्यात लहान मुलांसाठी पुस्तके होती. परंतु ग्रंथालय म्हणून एकत्र नव्हती पुस्तकांची फक्त नोंद होती. मुलांना पुस्तके देणे, परत घेणे ही संकल्पनाच नव्हती. मग शिक्षक, मुख्याध्यापक व ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे एकत्र बसलो तेव्हा मी या विषयावर सविस्तर चर्चा केली. सर्व पुस्तकांची एक नोंद वही केली . त्यात पुस्तकाची संपूर्ण माहिती व त्यापुढे ते पुस्तक वाचायला दिलेल्या व परत घेतल्याची नोंद हवी हे सांगितले. शक्यतो सर्व पुस्तके एकत्र स्वरूपात एकाच खोलीत असावीत व त्यासंबंधीचे काम एका शिक्षकाला किंवा त्यांच्यातील एक दोन विध्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यावर सोपवावे हे सुचविले. परंतु मुले जास्त नाहीत, शिक्षक जास्त नाहीत अन मुख्याध्यापकही जरा उदासीनच जाणवले. दीपस्तंभ सभासदांनी ग्रंथालय तज्ञ् व्यक्तीला बोलावून सर्व पुस्तकांची नोंद करून घेतली. साधारण दोन हजार नवीन पुस्तके शाळेला देण्यात आली. आणि ग्रांथालय कसे असावे त्याचे कामकाज कसे असावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे काम एका दिवसाचे नव्हे मागे लागून करावे लागेल. दीपस्तंभ सभासदांसोबत सोबत लागेल ती मदत करायला मी तयारी दर्शवली . आम्ही जाताना त्यांच्या ग्रंथायाला भेट म्हणून पुस्तक नेली होती ती दिली.

दोन वर्गात मुलांशी गप्पा केल्या . त्यांना गोष्टी सांगितल्या शिक्षकही उपस्थित होतेच . त्याच शाळेत पुन्हा जाऊन फीडबॅक घेतला . मुले आकर्षित वाटली . शिक्षकही उत्सुक होते. यावेळी मुलांकडून गोष्टी तयार करून घेतल्या . एक वाक्य एकाने सांगायचे . त्यापुढे दुसऱ्यानं दुसरे वाक्य सांगायचे . असे करत गोष्टी पूर्ण करायची. गोष्टीचा ओघ कुठल्याकुठे जातो . मुले जाम खुश होती . शिक्षकांनाही या नवीन कल्पनेची मजा वाटली .

यानंतर कोंडगावच्या शाळे.त गेलो. अतिशय दुर्गम ठिकाणी शाळा पण फार स्वच्छ आणि व्यवस्थित होती . मुख्याध्यापक व शिक्षकही शिस्तबद्ध होते . पहिली – दुसरी व तिसरी – चौथी असे दोन गट केले व त्यांना कोडी घातली. मुले चंट होती, पटापट उत्तरे मिळाली. मग समानार्थी व विरुद्धार्थी शब्द विचारले . भराभर उत्तरे सांगितली. मग एक प्रसंग सांगून त्यावर गोष्ट तयार केली, छोटी पण छान . पाचवी ते सातवी ची एकूण १० मुले एकत्र होती. त्यांना निबंध म्हणजे काय? तो कसा लिहावा? काय काय आवश्यक असते ते सांगून विषय देऊन निबंध लिहून घेतला. 'माझी शाळा' या विषयावर त्यांचे निबंधाच्या दृष्टीने विचार घेतले व विषय तयार करून घेतला . लहान मुलांनी तोवर शब्दकोडी सोडवली. विद्यार्थिसंख्या कमी असूनही, मुले हुशार व चुटचुटीत होती . याचे श्रेय शिक्षकांना आहे.

पण अजून संपर्क ठेवता आला तर शाळांतून चांगले वेगळे प्रकल्प तयार करता येतील . अनुष्का व लक्षमण बरोबर होतेच . त्यांना हे सर्व चर्चेत सांगितलं . आपल्या शाळांबद्धलच्या कल्पना आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात फार फरक असतो . तो फरक कमीतकमी करता यावा यासाठी हे सर्व प्रयत्न .

पुस्तके कशी हाताळावीत आणि पुस्तकांशी मैत्री कशी करावी ?

रांजणे गावात फीडबॅक साठी गेलो होतो . पुस्तकांच्या हाताळणी संबंधी मुलांशी बोलायचे होते . पुस्तके वाटेलतशी टाकू नयेत . पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान मिळते , ती जपून ठेवावीत . सरळ ठेवावीत . पुस्तक वाचून होई पर्यंत त्याला वर्तमान पत्राचे कव्हर घालावे , पाने दुमडू नयेत . तोंडात बोट घालून थुंकीने तर कधीच पाने पालटू नयेत. अशी किती जणांनी ती पाने उलटली असतील त्यांची थुंकी आपल्या बोटाना लागून आपल्या पोटात जाते , शिवाय पाने चुरगळतात . पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले तिथे खून म्हणून एखादे कार्डशीटचे 'मार्कर' बनवून वापरावे. त्यावर छान चित्र काढावे / चिटकवावे. असे मार्कर एकमेकांना वाढदिवसाची भेट म्हणून द्यावे . ते वापरण्याची सवय ठेवावी / लावून घ्यावी . पुस्तके वाटेल तशी टाकली की त्याचे कव्हर फाटते . मग हळूहळू आतली पाने खिळखिळी होतात . ते पुस्तक टिकत नाही . एक पुस्तक अनेक जणांना वाचायला / अभ्यासाला मिळावे म्हणून ते चांगले राहिले पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायची .

पुस्तक आपला मित्र. मित्राची कशी आपण प्रेमाने काळजी घेतो तशी पुस्तकांची काळजी घ्यायची असते. मित्राला लागले तर आपल्याला वाईट वाटते, तसे पुस्तकाची पाने निघाली तर आपल्याला वाटलं पाहिजे म्हणजे पुस्तकाला चांगल्या पद्धतीने हाताळले पाहिजे . पुस्तके रॅक मध्ये ऐटित ठेवली गेली तर बगणाऱ्यालाही छान वाटते . आपण आपली पुस्तके किंवा इतरांचीही पुस्तके वापरतो याचा आपल्याला सुयोग्य अभिमान वाटला पाहिजे. त्यासाठी आपण पुस्तकांवर प्रेम केले पाहिजे . त्यांच्यावर पेनसिलने, पेनाने लिहिण्याचा मोह टाळावा किंवा गिरवणे टाळावे. चित्रांना दाढी मिश्या काढणे अयोग्यच आहे . जेणे करून पुस्तक आतून बाहेरून छान असले पाहिजे ही काळजी घेण्याची सवय आपली आपणच लावून घेतली पाहिजे . शाळेने यासाठी मुलांना १० पैकी गुण द्यावेत किंवा बक्षीस ठेवावे . अशा काही हिताच्या गोष्टीसंबंधी चर्चा करताना सर्वानाच आनंद होत होता.

अशा विविध गोष्टींच समावेश आम्ही ग्रांथालयाचे व्यवस्थापन आणि मुलांमध्ये वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी करीत आहोत आणि मुलांना याचा खूप फायदा होत आहे.

– श्रीमती सरोज टोळे

जेष्ठ समाज सेविका आणि लेखिका

No Comments

Post a Comment

WhatsApp chat